पनवेल : पालिकेच्या प्रदूषण अहवालाला मराठीचे वावडे !

वेध ताज्या घडामोडींचा/दि.८,पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही. इंग्रजी भाषेतील या अहवालावर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. बुधवारी आयोजित सर्वसाधारण महासभेत प्रदूषणाची सद्यःस्थिती दर्शवणारा २०१९-२० व २०२०-२१ या वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला.

महापालिकेतील सर्व सदस्यांना समजेल, असा मराठी भाषेत अहवाल तयार करून त्याच्या प्रति नगरसेवकांना अभ्यासासाठी पाठविल्यानंतरच अहवालाला मंजुरी देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. सध्या पालिका क्षेत्रातील विविध नोडमधील नागरिकांकडून प्रदूषणाच्या तक्रारी येत आहेत, मात्र अहवालात प्रदूषणात घट झाल्याचा उल्लेख म्‍हणजे एक प्रकारची थट्टाच असल्याचे मत नगरसेवक हरेश केणी यांनी व्यक्त केले आहे.मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण विभागामार्फत मागील वेळी देखील वस्तुस्थितीला धरून अहवाल सादर न तयार करता सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला. या वेळी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी, अहवाल तयार करताना वातावरणातील कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करण्यात आल्‍याची माहिती देण्यास सांगितले.

प्रदूषण अहवालावर टीका झाल्‍याने आज केवळ तो सादर करण्यात आला असून, सर्व नगरसेवकांना सद्यःस्थितीतील अहवालाची प्रत प्राप्त झाल्यावर चर्चा करून सदस्यांनी सुचवलेल्या सूचनेनंतरच अहवाल मंजूर केला जाणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली आहे. संस्‍थेकडून मराठीत अहवाल सादर केला जाईपर्यंत संस्थेला कोणत्याही प्रकारचे देयक अदा केले जाऊ नये, अशी मागणी सदस्‍यांनी या वेळी केली.

प्रतिक्रिया-अहवाल तयार करणाऱ्या संस्थेने सर्व सदस्यांना समजेल अशा मराठी भाषेत अहवाल तयार करून द्यावा तसेच अहवालावर संक्षिप्त पुस्तिका तयार करून द्यावी अशी आमची मागणी असून त्या नंतरच अहवालावर चर्चा केली जाईल. असे परेश ठाकूर, सभागृह नेते

प्रतिक्रिया– प्रदूषणाच्या कोणत्याही घटकाचा अभ्यास न करता या पूर्वी देखील अहवाल तयार करणाऱ्या संस्थेने सदस्याच्या डोळ्यात धूळफेक केली होती. मात्र या वेळी सर्वांना समजेल असा अहवाल तयार करून तो सदस्यांना द्यावा ही आमची आग्रहाची मागणी आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *