शास्त्रोक्त वृक्षछाटणीसाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
वेध ताज्या घडामोडींचा/दि.५ मुंबई प्रतिनिधी: मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात हिरवळ टिकवून ठेवण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागावर आहे. शहरात मान्सून काळात येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून अपघात होण्याच्या घटनांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी धोकादायक वृक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी केली जाते.
या छाटणीदरम्यान वृक्षांना कमीत कमी इजा होईल आणि त्यांच्या संवर्धनास बाधा येणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असते.
मा. उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून, शास्त्रोक्त वृक्षछाटणीसंबंधी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली पश्चिम येथे एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेचे आयोजन परिमंडळ ३, ४ व ७ साठी करण्यात आले होते. उप उद्यान अधीक्षक श्री. सचिन वारिसे, श्री. मुंडे आणि श्री. सचिन अतर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात वृक्षतज्ज्ञ श्री. विवेक राणे व रॉबर्ट फर्नांडिस यांनी वृक्ष छाटणीच्या शास्त्रोक्त तंत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वृक्षछाटणी कशी करावी, कोणती काळजी घ्यावी आणि वृक्षांचे जतन कसे करता येईल याविषयी माहिती दिली.सदर कार्यशाळेस महापालिकेच्या पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यानविद्या सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी व वृक्ष छाटणीचे काम करणारे कामगार मिळून १५० जणांनी आपली उपस्थिती नोंदविली.
कार्यशाळेत उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपल्या शंकांची उत्तरे तत्काळ मिळवून समाधान व्यक्त केले. यावेळी सर्वांनी यापुढे छाटणी कार्य केवळ शास्त्रोक्त पद्धतीनेच करण्याची प्रतिज्ञा केली.
या कार्यशाळेच्या माध्यमातून केवळ वृक्षांचे रक्षणच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेलाही महत्त्व दिले गेले असून, या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आगामी काळात निश्चितच दिसून येतील.