माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलनाचा इशारा

मंगळवार 20 मे रोजी  बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई येथिल महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण 
वेध ताज्या घडामोडींचा/मुंबई, दि. १९ : राज्यात माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीच्यावतिने मंगळवार दि. २० मे, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पुर्व), मुंबई येथिल महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव (वय ९६ वर्ष) करणार आहेत. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते मा. आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते अविनाश रामिष्टे, दिपक रामिष्टे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, अखिल महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते पोपटराव पाटील, अखिल भारतीय माथाडी, सुरक्षा रक्षक श्रमजिवी आणि जनरल कामगार युनियनचे नेते राजन म्हात्रे, अरुण रांजणे, मेटल बाजार कामगार संघाचे शिवाजी सुर्वे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या श्रीमती नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, ट्रान्सपोर्ट अॅण्ड डाँक वर्कर्स युनियनचे निवृत्ती धुमाळ आदी युनियनचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने, मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे, माथाडी कामगारांना नोंदीत न करणे, बेकायदेशिररित्या कामावरुन काढलेल्या कामगारांना न्याय न देणे, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे, वेळेवर पगार न करणे, वेतनवाढ वेळेत व योग्य न करणे, कामगारांना दंड आकारणे, थकबाकी वसुलीला विलंब लावणे, RRC’s’ वसुलीसाठी पाठपुरावा न करणे, खाजगी बाजार समित्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी न करणे, कापूस फेडरेशन व एकाही साखर कारखान्यात कायदा न लावणे, एमआयडीसी मधील ५% कारखान्यातही माथाडी कायद्याची अंमलबजावणी न करणे व इतर प्रश्नांचा समावेश आहे.
विविध माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगारांच्या वर नमुद केलेल्या प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त यांना माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीने सादर केले असून, कामगार आयुक्त, सह कामगार आयुक्त (माथाडी), विविध माथाडी मंडळाचे चेअरमन व सेक्रेटरी यांचेसमवेत कृती समितीची संयुक्त बैठक घ्यावी आणि प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात कृती समितीने केली आहे.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडून माथाडी अॅक्ट, १९६९ या कायद्याची आणि विविध माथाडी मंडळाच्या स्थापना करुन घेतल्या, या अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राज्य शासन व कामगार विभागाकडे केली आहे, त्यावर राज्य शासनाने दुर्लक्ष करुन माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक ३ अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणले, त्यावेळी माथाडी कामगारांच्या हक्काला बाधा येणार नाही याकरीतां नियमावलीचे शासन निर्णय पारीत करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे, परंतु त्याबाबत संयुक्त बैठक कृती समितीबरोबर घेतली जात नाही, कृती समितीने लाक्षणिक संप, आमरण उपोषण निदर्शने यासारखी तीव्र आंदोलने केली, परंतु राज्य सरकारने आश्वासन दिली आहेत म्हणून आतां यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेणे भाग पडेल, असा इशारा माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *