उपप्राचार्य एन.जी.गायकवाड सर प्रदीर्घ सेवेनंतर 30 एप्रिल रोजी सेवावृत्त
वेध ताज्या घडामोडींचा/दि.23/अहिल्यानगर प्रतिनिधी -( पांडुरंग निंबाळकर)
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,कार्यकुशल उपप्राचार्य प्रा.एन. जी. गायकवाड सर येत्या 30 एप्रिल 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.त्यानिमित्ताने सरांच्या एकूणच कार्याचा ,व्यक्तित्वाचा घेतलेला हा धांडोळा…
उपप्राचार्य प्रा.एन.जी.गायकवाड सर यांचा जन्म शेवगाव तालुक्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील गायकवाड जळगाव या छोट्याशा खेड्यातील गरीब शेतकरी कुटुंबात झाला .ग्रामीण भागात शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने, अनमोल कार्याने विराजमान झालेले व्यक्तित्व म्हणजे एन.जी. सर होत. 1996 साली ओम शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा खेड्यापर्यंत नेण्यात एन.जी. सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी जालना व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शाळा काढून नावारूपाला आणल्या आहेत याच विद्या मंदिरात (शाळेत) ग्रामीण भागातील असंख्य गोरगरीब, शेतकरी, शेतमजूराची दिन- दलितांची मुलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली या पाठीमागे एन.जी. सरांचा शिक्षणाबद्दलचा विशाल आणि व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. आपल्या संस्थेतील शाळेबद्दल
आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती देताना एन.जी. सर म्हणतात आपली शाळा इतर शाळा पेक्षा कशी वेगळी आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांना ज्ञानदानासोबतच संस्कारक्षम उत्तम विद्यार्थी कसा घडवता येईल याचा प्रामुख्याने मी विचार करतो त्यामुळेच आम्ही शाळेमध्ये जर्मन,जपानी भाषेचा कोर्स सुरू केला असून या जर्मन भाषेच्या माध्यमातून
विद्यार्थी दशेपासूनच रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली आहे.यावरून आपणास असे दिसून येते की काळाचे पावले किती अचूकपणे एन.जी. सरांनी ओळखलेली आहेत.
महाविद्यालयीन आवारात तसेच कार्यालयामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांच्या शारीरिक व मानसिक छळावर प्रतिबंध घालण्यासाठी उपप्राचार्य एन.जी.सरांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात सक्षम समितीची स्थापना करण्यात आली. या सक्षम समितीच्या माध्यमातून महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थी,विद्यार्थिनी यांना सुरक्षित,भयमुक्त आणि निर्भीडपणे जीवन कसे जगता येईल या दृष्टिकोनातून ही समिती कार्य करणार आहे.
शाळा महाविद्यालयात व परिसरात मुलींच्या सुरक्षितते बाबत सर्व त्या उपाययोजना करण्यासंदर्भात छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी यांनी सर्क्युलर काढून या सर्क्युलर मधल्या पहिल्या व सहाव्या मुद्द्यांमध्ये एन.जी.सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात
सुरू झालेल्या ‘सक्षम समिती’ आणि ‘आई मेळावा’ या उपक्रमाचा मा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एन.जी. सरांचा विशेष उल्लेख करून त्यांचे कौतुक केले आहे.
मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक/ प्राथमिक (छत्रपती संभाजीनगर) यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालयात एन.जी. सरांनी देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात राबविलेली सक्षम समिती स्थापन करणे, आई मेळाव्याचे आयोजन करणे व मुली व त्यांच्या आईंना बोलते करावे ही भूमिका घेतली यासाठी विशेष अभिनंदन आपण एन.जी. सर यांचे केलेच पाहीजे.अनेक माणसाशी प्रेमाने आपलं नातं घट्ट ठेवून मोठा मित्रपरिवार त्यांनी निर्माण केला आहे. कष्टकरी आई-वडिलांची पुण्याई सोबत घेऊन कणखरपणे नव्याने स्वतःचे नव विश्व उभं केलं आहे. पालक ,विद्यार्थी, शिक्षक यांच्या संवादावर भर देणारे आणि शैक्षणिक कार्याबरोबरच समाजाभिमुख कार्य उत्तमपणे पार पाडणारे एन.जी. सर म्हणजे चालतं-बोलत विद्यापीठ होय.पालक मेळावा हा तर महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात होतो पण एन.जी. सरांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात “आई महोत्सव” या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते आणि तिसरा आई महोत्सव यावर्षीही मोठ्या थाटात महाविद्यालयात संपन्न झाला. अशा प्रकारचा उपक्रम घेणारे “देवगिरी महाविद्यालय” हे महाराष्ट्रातले पहिलेच महाविद्यालय ठरले आहे या उपक्रमाची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. मुळात एन.जी.सरांची आई मेळाव्याची मूळ संकल्पना व्यापक आणि दिशादर्शक आहे. ” ते म्हणतात आजच्या या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात आपण आयुष्य सुंदर असते हेच विसरून गेलो आहोत आलेल्या अडचणीवर ,संकटावर मात न करता असंख्य विद्यार्थी आत्मकेंद्री आणि नैराश्याकडे वाटचाल करत आहे अशावेळी आईची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मुले-मुली सर्वाधिक आईच्या जवळ मन मोकळं करत असतात मुलांना वेळ देणं, समजून घेणे प्रसंगी त्याच्या पाठीमागे धीरोदात्त उभं राहणं,बळ देणं त्याच्यासोबत संवाद वाढवणं काळाची गरज झाली आहे.आजच्या वेगवान युगात येणाऱ्या पिढ्यांची आव्हान समजून घेणे ही काळाची गरज बनली आहे. पालकांनी कुटुंबात संवाद ठेवणे आवश्यक आहे मुलांना समजून घेऊन त्यांच्या समस्या विषयी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.कुटुंबाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी आईवर असून घरातील वातावरण पोषक ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी आईला पार पाडावी लागते. त्यामुळे आईला येणाऱ्या अडचणी व त्यावर करावी लागणारी कसरत विचारात घ्यावी लागणार आहे माध्यमिक शिक्षक व उच्च शिक्षण यांना जोडणारा दुवा म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण अर्थात अकरावी आणि बारावी हा मुला- मुलींच्या आयुष्याला दिशा देणारा, आकार देणारा महत्त्वाचा टप्पा होय. या काळात काही मुले-मुली घरापासून दूर असतात काही वेळेस त्यांची वाट चुकण्याची शक्यता असते अशा वेळेस आईची भूमिका जबाबदारी- निश्चित मोलाची ठरते. या अनुषंगाने मुला-मुलींशी आईचे नाते कसे असावे,मुलं नैराश्यात जाणार नाही याची कशी काळजी घ्यावी
यासंबंधी एन.जी. सरांची भूमिका विलक्षण आणि व्यापक आहे.”एन.जी. सरांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शुल्क आकारून देवगिरी JEE, NEET, MHT-CET चे सर्व सोयीसुविधांनी युक्त असणारे अद्यावत सेल स्थापन झाले आहे. या पाठीमागे एन.जी. सरांची कल्पकता, आखीव ,रेखीव नियोजन आणि मार्गदर्शनामुळेच अल्पावधीतच देवगिरी JEE NEET सेलला नवा चेहरा मोहरा प्राप्त झाला आहे. म्हणूनच की काय JEE ,NEET,MHT-CET सेलच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातच निकालाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली केली असून
अल्पावधीतच या सेलच्या माध्यमातून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचे इंजिनियर, डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे. आज सेलमध्ये 650 च्या वर विद्यार्थी अध्ययनाचे कार्य करत आहे. या पाठीमागे एन.जी. सरांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. एन.जी.सरांनी पाहिलेले स्वप्न म्हणजे आगामी काळात देवगिरी महाविद्यालयाचा “देवगिरी ब्रँड” कसा निर्माण करता येईल यासाठी कार्य करणारे, कष्ट करणारे एन.जी.सर म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा देणारे प्रशासक ठरतात.कवी कुसुमाग्रज यांचं कोलंबसचे गर्वगीत आहे. आकाशाला भिडणाऱ्या जीवांनी तांडव करणारा समुद्र… त्या समुद्राच्या दशदिशांच्या ओंजळीत आपला इवलं तारू घेऊन विलक्षण जिद्दीच्या सुकाणू क्षितिजापार निघालेला कोलंबस अनंत आमची ध्येयशक्ती… ही त्या कोलंबसची जिद्द, अनंत आशा ही उज्वल भविष्याचे स्वप्न… आणि किनारा तुला पामराला असं म्हणणं आणि यातून त्या जिद्दीपुढे समुद्राचे बिचारेपण… मला वाटतं हेच ते जगणं ! अनुकूलतेच्या श्वासाचा पताका फडकवित तर अनेक जण जिवंत राहतात पण प्रतिकृतीचे पंख करून आसमान शोधणारे ते खरे जगतात. हा कोलंबस केवळ इतिहासातला उरला नाही तर आयुष्यातल्या संकटावर मात करून उड्डाण करू पाहणारे कुठलही मन मला कोलंबस वाटू लागते ते मन मला एन.जी. सरांच्या जगण्यात,विचारात आणि एकूणच त्यांच्या कृतीत दिसून आलं आहे.प्रत्येक माणूस जगत असतो… आणि जगताना तो भरत असतो… असं जगता आलं पाहिजे आणि असं जगताना भरत गेले पाहिजे . एन.जी.सर आपल्या उपप्राचार्यपदाच्या कार्यकाळात वैविध्यपूर्ण उपक्रमातून आणि नाविन्यपूर्ण योजनेतून भरत गेले जसे आई मेळावा, शैक्षणिक सहलीचे आयोजन, देवगिरीJEE, NEET, MHT-CET पॅटर्नची प्रभावी अंमलबजावणी , अकॅडमीक कॅलेंडर, जागतिक महिला दिन, महिला शिक्षकांसाठी नवरात्र महोत्सव, करिअर गाईडन्स, जिल्हास्तरीय सराव समृद्धी प्रकल्प, सक्षम समिती, शाखानिहाय ड्रेस कोड,विद्यार्थी पियर ग्रुप संकल्पना, यु-डायसची प्रभावी अंमलबजावणी ,self appraisal form यासारख्या उपक्रम व योजनेतून एन.जी. सर भरत गेले आणि त्यांनी स्वतःची ठळक अशी नाममुद्रा उमटवली आहे.प्रत्येकाला आपल्या कार्यातून संधी चालून येत असते, काहीजण कुस बदलतात, काहीजण खडबडून जागे होतात, झपाटून उठतात, कामाला लागतात,ही संधी कधी वाचनातून, कधी चरित्रातून, कधी संकटातून, कधी सुसंगतीतून ,कधी प्रवचनातून ,कधी ज्ञानोबाच्या ओवीतून, कधी तुकारामाच्या अभंगातून, त्यामुळे आपण सज्ज असलं पाहिजे,हाच तो क्षण आहे झडझडून जाग होण्याचा, निराशा पूर्ण झटकवण्याचा, जगायचा आणि भरायचं तोच क्षण/ संधी एन.जी. सरांनी अचूक हेरून आलेल्या संधीचं सोनं केलं,आपले महत्तम कार्य केले.जमिनीतील रोप बाहेर यावं लागतं.त्याप्रमाणे गुणवत्ता ही आतून यावी लागते.एवढंस रोप आपल्या नाजूक पण चिवट मुळांनी जमिनीतील अन्नरस शोषून घेते, हळव्या पोपटी पर्णानी सूर्याकडून उष्णता घेऊन हरितद्रव्य तयार करावी लागतात तेव्हा कुठे फुलं फुलू लागते, यशाचेही तसच आहे.प्रत्यक्ष मेहनतीतून,श्रमातून, ध्यासातून यशाची फुल उमलत असतात. तीच मेहनत, तीच कार्यक्षमता, तोच ध्यास एन.जी. सरात आम्हाला नेहमी बघायला भेटतो. म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा आलेख आपल्या कृतीतून, विचारातून जनसामान्यापर्यंत उंचावत नेला आहे.
सर्वसामान्य माणसाची दुःख, वेदना, संघर्ष, शिक्षकांची आणि संघटनेची वस्तुस्थिती काय आहे याची इत्यंभूत माहिती असणारे व्यक्ती म्हणजे एन.जी.सरांकडे बघितल्या जाते. अनेक लोकांचे कल्याण करणारा हा व्यक्ती सर्वांना हवाहवासा वाटतो.
रसायनशास्त्राच्या अध्यापनासोबतच प्रशासन आणि शिक्षण याबाबत असलेला एन.जी.सरांचा प्रदीर्घ अनुभव, सखोल अभ्यास शैक्षणिक विकासासाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला आहे. स्वभावात असलेली पराकोटीची नम्रता ,शैक्षणिक गुणवत्ता व विकास ,विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेली तळमळ,आपल्या कार्याबाबतची बांधिलकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत सर्वांचं हित जोपासले जाईल हा विचार करणं, आलेल्या प्रत्येक माणसाच्या भल्यासाठी नकळतपणे आवश्यक ती मदत करणं हे सर्वकाही हल्लीच्या काळात दुर्मिळ आहे, मात्र एन.जी. सर हे सर्वकाही अगदी सहजपणे करताना अनुभवायला मिळतात. त्यांच्या आचरणातील ही संतवृत्ती अत्यंत सहजपणे ते जोपासताना आपल्याला बघायला मिळतात.
एन.जी सरांचे काही वैशिष्ट्ये/ पैलू आहेत ती अशी एन.जी. सरांच्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली आहे याची परिचिती त्यांनी आतापर्यंत राबवलेल्या उपक्रमातून पहावयास मिळते. एन.जी. सरांनी प्रत्येक उपक्रम ध्येय ठेवून केली आहे या पाठीमागे त्यांची ध्येयनिश्चिती दिसून येते सरांचे अनुशासन फारच महत्त्वाचे आहे एका चांगल्या लीडरचे अनुशासन कसे असावे याचा एक वस्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे.
एखाद्या उपक्रमाबद्दल सकारात्मक पाऊल उचलत तो उपक्रम राबवताना त्यामागची चिकाटी ,दृष्टिकोन त्याच्यासाठी हवे असणारे वातावरण एन.जी. सरांनी निर्माण करून दिले आहे.
प्रशासनातल्या प्रमुखाकडे नियोजन असणे गरजेचे असते नेतृत्व करणाऱ्या प्रशासकाला ध्येय गाठण्यासाठी योजना आखणी अगत्याचे आणि त्या योजना पूर्ण करण्यासाठी नियोजन व पूर्वतयारी करण्याची जबाबदारी टीम लीडरलाच पार पाडावी लागते.एन.जी. सरांनी ही जबाबदारी आपल्या कार्यकाळात लिलया पार पाडली या पाठीमागे त्यांचे नियोजन( प्लॅनिंग) फार महत्वपूर्ण ठरले आहे.
एन.जी. हे खऱ्या अर्थाने मासलिडर ठरतात.कारण सर्व सहकारी शिक्षकांची बाजू ऐकून सर्वांचे हित पाहून योग्य निर्णय घेणारे आणि निर्णयामध्ये सर्वांना स्थान देणारे एन.जी. सर अजब रसायन आहे.
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, भरभराटीचे,आनंदाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…