वेध ताज्या घडामोडींचा/!नवीमुंबई, दि. २५ – माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून मी ग्वाही देतो की. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही वा माथाडी कायद्याची छेडछाडही आंम्ही करणार नाही अथवा रद्दही करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतिने माथाडी कायद्याचे जनक कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नवीमुंबईतील कांदा-बटाटा मार्केटच्या प्रांगणात आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते, देवेंद्र फडणवीस पुढे असे म्हणाले की, फेक माथाडी कामगार आणि खंडणी वसुल करणा-यांना जेलबंद करता आले पाहिजे, त्यासाठी माथाडी कामगार व नेत्यांनी चर्चा करुन माथाडी कायद्यात योग्य ते बदल सुचवावेत. जेणेकरुन खंडणीखोर आणि फेक माथाडी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, आम्ही शासनामार्फत त्यांच्यावर कारवाई केली पण कायद्यातील पळवाटांमुळे ते सुटतात म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की, माथाडी कायद्यात अशा लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी योग्यते बदल सुचवा. कायद्याला बदनाम करणा-यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तर माथाडींच्या अन्य समस्यांवर बोलताना ते म्हणाले की, सिडकोच्या माध्यामातून अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाला ५ एकर भूखंड सिडकोकडून मिळण्यासाठी पाठपुरावा करु. तसेच माथाडी कामगारांच्या शिक्षित मुलांना माथाडी मंडळाच्या कार्यालयात नोकरी देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करु व ती कार्यान्वीतही होईल, सिडकोमार्फत ट्रक टर्मिनलच्या जागेवर राबविल्या जाणाऱ्या घरकुलात माथाडी कामगारांना घरे देण्याचे आदेश सिडकोला दिले जातील.
सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आम्ही न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणाची सरकारमार्फत योग्य बाजू मांडून व त्याला कायद्याच्या चौकटीत बसवून सोडविण्याचा प्रयत्न करू. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर नरेंद्र पाटील यांची अध्यक्ष पदावर नेमणूक केली तेंव्हा एक लाख मराठा उद्योजक उद्दीष्ट त्यांच्यासमोर आम्ही ठेवलं होतं, आतांपर्यंत कालावधीत त्यांनी ६५ हजार उद्योजक निर्माण केले. त्याबद्दल महामंडळाच्या कार्याचा आणि नरेंद्र पाटील यांचा गौरवही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
माथाडी कामगार नेते सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे आपल्या भाषणात म्हणाले, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी माथाडी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणताना आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते, पण ते केलं गेलं नाही. माथाडी कायद्यात कामगार हिताविरोधी काहीही बदल करु देणार नाही व आमची विश्वासाहर्ता ही माथाडी कामगार चळवळ आणि माथाडी कामगारांशी निगडीत असून आम्ही कामगारांशी बेईमानी कधीही करणार नाही. आज माथाडींच्या नांवावर लूटमार, खंडणी वसुल करणा-यांना पोलीस यंत्रणेने गजाआड केले पाहिजे ही आमची मागणी गेल्या कित्येक वर्षांची असून ती देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून तत्परतेने सोडवावी व आमच्या प्रलंबित मागण्यांचाही लवकरात लवकर विचार करुन त्या सोडवाव्यात, अशी विनंतीही त्यांनी फडणवीस यांना केली.
नवीमुंबईचे आमदार व माजी कामगार मंत्री गणेशजी नाईक यांनी माथाडींच्या अनेक समस्या आपण कामगार मंत्री असताना कशा पध्दतीने तत्परतेने सोडविल्या याचा उल्लेख करून माथाडींच्या समस्यांवर आपलं मत भाषणात व्यक्त केले. तसेच ते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप हे कोणाचीही सत्ता असली तरी माथाडी कामगारांच्या विविध मेळाव्यामध्ये कौशल्याने मंत्री महोदय यांना व्यासपिठावर आमंत्रित करतात आणि त्या माध्यमातून माथाडींच्या समस्यांची तत्परतेने सोडवणुक करतात. ही या संघटनेची व नेत्यांची खासियत आहे असेही ते म्हणाले.
संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक माथाडी कायद्यात बदल करावेत म्हणून लढत असले तरी व्यापाऱ्यांनीच आमच्यावर माथाडी कायदा लावा, अशी मागणी केली आहे. माथाडी कामगारांवर त्यांचा विश्वास आहे, असे सांगून त्यांनी माथाडी कायद्यातील सुधारणेच्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी संयुक्त चिकित्सा समिती नेमली आहे. त्या समितीने विविध संघटनांच्या नेत्यांनाही विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.
संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात उपस्थित मंत्री महोदय व मान्यवरांचे स्वागत केले व माथाडी कामगारांच्या विविध समस्या मांडल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले. मेळाव्यास सातारा विधानसभेचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदिप नाईक, बाजार समितीचे सभापती अशोक डक, सचिव पी. एन. खंडागळे, माथाडी हॉस्पीटलचे डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, दिलीप खोंड, कायदेशिर सल्लागार अॅड्. भारतीताई पाटील, नवीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, बाजार समितीच्या आवारातील व्यापारी प्रतिनिधी, बाजार समितीचे संचालक, नवीमुंबई महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, समाजसेवक, माथाडी मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते,
मेळाव्यात १८ गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भुषण हा पुरस्कार देऊन मंत्री महोदय यांच्या हस्ते गौरविण्यात आले, रुपेश कोंढाळकर या माथाडी कामगाराच्या मुलाचा खो-खो स्पर्धेत विजेता म्हणून सत्कार करण्यात आला, युनियनच्या वेबसाईटचे उद्घाटन तसेच माथाडी मित्र पाक्षिकाचे पुनःप्रकाशन मंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आले.
अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
