नवी मुंबईमध्ये हजारो नागरिकांनी घेतली स्वच्छतेची शपथ; आठ विभागांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७,नवीमुंबई: इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत महानगरपालिकेचे स्वच्छतेची चळवळ सुरू केली आहे. रविवारी पहाटे आठ विभागातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या सामुहीक शपथ सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते अशा हजारो नागरिकांनी एकत्र येवून शहर स्वच्छतेची शपथ घेतली.
स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईकर विद्यार्थी, नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली जागरूकता आणि शहराविषयी असणारे प्रेम यांचे दर्शन घडविणारा हा भव्यतम उपक्रम नवी मुंबईला स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा व शहरात स्वच्छतेची चळवळ निर्माण करणारा ठरला.
स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाच्या अंतर्गत पहाटे ८ वाजता प्रत्येक विभागात नागरिकांनी शपथ घेण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावली होती. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींनी, बचतगटांच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.
बेलापूर विभागात राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर व इतर ठिकाणी 10500 हून अधिक नागरिक, नेरूळ विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर 26 व इतर ठिकाणी 21800 हून अधिक नागरिक, वाशी विभागत मॉडर्न महाविद्यालय मैदान, सेक्टर 15 /16 व इतर ठिकाणी 13900 हून अधिक नागरिक, तुर्भे विभागत जयपुरिया स्कूल जवळ, सेक्टर 18, सानपाडा व इतर ठिकाणी 10700 हून अधिक नागरिक. कोपरखैरणे विभागात निसर्ग उद्यान, सेक्टर 14 व इतर ठिकाणी 12300 हून अधिक नागरिक, घणसोली विभागात सेंट्रल पार्क, सेक्टर 3, घणसोली व इतर ठिकाणी 6400 हून अधिक नागरिक तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रांगणात रबाळे येथे 5200 हून अधिक विद्यार्थी पालक नागरिक, ऐरोली विभागात आर आर पाटील मैदान, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ, सेक्टर 15 व इतर ठिकाणी 16500 हून अधिक नागरिक तसेच दिघा विभागात नागरी आरोग्य केंद्रासमोरील पटांगण व इतर ठिकाणी 4500 हून अधिक नागरिक अशा प्रकारे आठ वॉर्डांत नऊ मुख्य व इतर काही ठिकाणी एकत्र येत एकूण 1 लक्ष 14 हजारहून अधिक नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
नवीमुंबई मध्ये आठ विभागात घेण्यात आली शपथ
बेलापूर – राजीव गांधी क्रीडा संकुल सेक्टर ३ सीबीडी बेलापूर
नेरूळ – ज्वेल्स ऑफ नवी मुंबई सेक्टर २६ नेरूळ
वाशी – मॉडर्न महाविद्यालय मैदान वाशी सेक्टर १५
तुर्भे -जयपुरीया स्कूल सेक्टर १८ सानपाडा कोपरखैरणे – निसर्ग उद्यान सेक्टर १४ कोपरखैरणे
घणसोली – सेंट्रल पार्क सेक्टर ३ घणसोलीऐरोली – आर आर पाटील मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ऐरोली सेक्टर १५
दिघा – नागरी आरोग्य केंद्रासमोरील पटांगण दिघा
यावेळी 5 ठिकाणी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तेथेही उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून खारफुटी स्वच्छतेत सहभागी झालेल्या जागरूक नागरिकांना प्रोत्साहित केले. यामध्ये 10 हजार 500 हून अधिक नागरिक स्वयंस्फु्र्तीने सहभागी झाले होते. त्यातही युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.