स्वातंत्र्यदिनी सेक्टर 4 घणसोली येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

वेध ताज्या घडामोडींचा/दि.१७, नवीमुंबई:  नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सकारात्मक पावले उचलत असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सेक्टर 4 घणसोली येथे आयुक्तांच्या हस्ते नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले.
           याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, परिमंडळ 2 उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व डॉ. रत्नप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री मदन वाघचौरे व श्री प्रवीण गाढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके, डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ. अजय गडदे आणि नूतन नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील तसेच माजी नगरसेविका श्रीम. उषा कृष्णा पाटील व श्रीम. सुवर्णा प्रशांत पाटील आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
              घणसोली विभाग हा नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेला सर्वात नवीन नोड असून या ठिकाणची लोकसंख्या लक्षात घेता घणसोली गावाव्यतिरिक्त आणखी एक नागरी आरोग्य केंद्र असावे अशी सातत्याने मागणी होत होती. त्यास अनुसरून सेक्टर 1 ते सेक्टर 11 या संपूर्ण क्षेत्रातील नागरिकांना सोयीचे होईल अशा घणसोली, सेक्टर 4 येथील मध्यवर्ती जागेत नवीन नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात येऊन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आरोग्य सेवेची ही भेट नागरिकांना प्रदान करण्यात आली.
 अर्थसंकल्प सादर करताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल हे विशेषत्वाने नमूद केले होते. त्यानुसार सेक्टर 4, घणसोली येथील नवीन नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येऊन कालमर्यादित नियोजन करीत हे केंद्र भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले आहे.
          या आरोग्य केंद्रातून बाह्यरुग्ण विभाग, गरोदर मातांची तपासणी, बालकांचे व गरोदर आणि मातांचे सर्व प्रकारचे लसीकरण, क्षयरोग तपासणी, हिवताप तपासणी, संसर्गजन्य रोगांवरील उपचार, डायबेटीस व हायपर टेन्शन वरील उपचार तसेच दर बुधवारी नियमित लसीकरण सत्रे अशा विविध आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यात येणार आहेत.
          घणसोली सेक्टर 1 ते सेक्टर 11 या भागातील 65 हजाराहून अधिक नागरिकांना सेक्टर 4 घणसोली येथील या नवीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचा लाभ होणार असून यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी हे आरोग्य केंद्र सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *