वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान 9 ऑगस्टपासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने 9 ऑगस्ट रोजी सेक्टर 26, नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या आयकॉनिक पर्यटनस्थळी भव्यतम कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत मातृभूमीविषयीचे प्रत्येक भारतीयाचे प्रेम आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या विरांविषयीचा अभिमान व्यक्त करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्याविषयीच्या सूचना केंद्र सरकार मार्फत प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार 9 ते 14 ऑगस्ट या काळात वेगवेगळ्या स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘वसुधा ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती हा असून या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अर्थात 75 व्या वर्षाचे औचित्य साधून 75 देशी वृक्षारोपांची लागवड करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ सारख्या निसर्गरम्य ठिकाणी 75 प्रकारच्या देशी वृक्षारोपांची मान्यवरांच्या शुभहस्ते लागवड करण्यात आली आणि अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात आली.
अमृत वाटिकेची निर्मिती करताना महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे साधारणतः 600 चौ.मी. वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्राची निवड करण्यात आली. त्याठिकाणी 75 खड्डे करण्यात येऊन त्यासाठी आवश्यक माती आणि खतांचीही व्यवस्था करण्यात आली. त्या जागेमध्ये एकूण 75 देशी वृक्षारोपांची लागवड करावयाची असल्याने अर्जुन, जांभूळ, ताम्हण, बहावा, कडूनिंब, कदंब, चिंच, आवळा, तुती, सिताफळ, जाम, पेरू, कोकम, जायफळ, दालचिनी अशा विशिष्ट देशी वृक्षरोपांची मान्यवरांच्या शुभहस्ते लागवड करण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ उपक्रमाच्या अनुषंगाने निर्माण केलेले ही 75 देशी वृक्षांची ‘अमृत वाटिका’ मातृभूमीला नमन आणि वीरांना वंदन करीत त्यांच्या स्मृती जागवणारी आहे.
‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ करीत ‘अमृत वाटिका’ निर्मिती
