पनवेल-उरणमध्ये ठाकरे शिवसेना-शेकाप आमनेसामने
वेध ताज्या घडामोडींचा/पनवेल/उरण :दि.५ पनवेल विधानसभा मतदारसंघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसात दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 13 उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या 13 उमेदवारांमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर विरोधात शेकाप-उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवाराची होणार आहे. प्रशांत ठाकूर हे यंदा चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा विजय देखील निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या आजचा 4 नोव्हेंबर शेवटच्या दिवशी पनवेल विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नाट्य पहायला मिळाले. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार लीना गरड उमेदवारी मागे घेणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र लीना गरड यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील आणि उद्धव बाळासाहेब गटाच्या लीना गरड या तिघांमध्ये मुख्य लढत होणार आहे.
या तीन बलाढ्य पक्षांसोबत पनवेल विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार योगेश चिले, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजेंद्र आहेर, भारतीय जन सम्राट पार्टीचे उमेदवार पवन काळे, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टीचे उमेदवार वसंत राठोड, रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार संतोष पवार या सोबत पाच अपक्ष उमेदवार आपले भविष्य आजमावणार आहेत. या अपक्ष उमेदवारामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ पत्रकार संपादक कांतीलाल कडू देखील रिंगणात उतरले आहेत. मात्र या 13 उमेदवारापैकी 12 उमेदवारांची मुख्य लढत भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत आहे. महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीचा फायदा देखील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनाच होणार आहे.
●शिट्टी चिन्हासाठी तडजोड
पक्षाच्या नावावर अधिकृत चिन्ह नसल्याने, शेकापचे उमेदवार यांना अखेरच्या क्षणाला देखील तडजोड करावी लागल्याचे बोलले जात आहे. दोन चिन्ह हातातून गेल्यामुळे तिसरे चिन्ह हातातून जाऊ नये म्हणून दुसर्या उमेदवाराला देण्यात येणारे चिन्ह ते आपल्या पदरात पाडण्यात बाळाराम पाटलांना यश आले आहे. त्यामुळे शेकापचा संघर्ष आज इथे देखील पहायला मिळाला.
दरम्यान, उरण विधानसभा मतदारसंघातील लढती अखेर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाल्या आहेत. महायुतीचे उमेदवार महेश बालदी, शिवसेना (उबाठा) माजी आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे प्रितम म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महा विकास आघाडीत समाविष्ट असलेल्या शेकापचे प्रितम म्हात्रे आणि शिवसेना (उबाठा) मनोहर भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र प्रितम म्हात्रे यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
पनवेल मतदारसंघ
पनवेल मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर निवडणूकीच्य रिंगणात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लीना गरड यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शेकापकडून माजी आमदार बाळाराम पाटील उमेदवार आहेत. लीना गरड यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून 2009 पासून प्रशांत ठाकूर हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2009 मध्ये काँग्रेसकडून तर 2014 आणि 2019 मधून त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आहे.
●लढणार आणि जिंकणार -प्रीतम म्हात्रे
जेएनपीए : उरणची जागा आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा असा दावा शेकापचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केला आहे. कार्यकर्ते ही शेकापची ताकद आहे. त्यांच्या निष्ठेने पक्ष वाढत असतो.आम्ही त्यांच्या इच्छेनुसार चालतो. या ठिकाणी स्थानिकांना कमी लेखण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांना जागा दाखवून देण्यासाठी आम्हाला लढणे आवश्यक आहे. शेकाप हा नेहमी संघर्ष करून यश संपादन करत असतो. पक्षाला चळवळीचा वारसा आहे.