वेध ताज्या घडामोडींचा/रायगडदि.१८:– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 150-ऐरोली, 151-बेलापूर, 188-पनवेल व 190-उरण या विधानसभा मतदार संघामध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे
विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे, कमान, पताका, कट आउट लावणे किंवा चिन्हे वापरतात त्यामुळे अनेक वेळा दो-या, काठया व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येऊन रहदारीस अडथळा होतो. प्रचाराचे कालावधीत अशा किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सामाजिक तेढ निर्माण होवू नये याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील निवडणूक कार्यक्षेत्रात महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 (1) (प) अन्वये पुढीलप्रमाणे या आदेशाच्या तारखेपासून पोलीस स्टेशन हद्दीत ही निवडणूक प्रकिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे
कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत, कंपाऊंड अथवा आवारात पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, कटआउट्स, कापडी फलक लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे इत्यादीचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशा लेखी परवानगीची छायांकीत प्रत स्थानिक पोलीस स्टेशन व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना 3 दिवसाचे आत देण्यात यावी, अशा रितीने खाजगी जागेवर लावलेले पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक इत्यादींमुळे रहदारीस अडथळा होणार नाही, उजेड व हवा अडवली जाणार नाही हे पाहणे त्या उमेदवाराला बंधनकारक राहील.हा मनाई आदेश दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी 18.00 वा. पासून ते दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी 24.00 वा पर्यंत लागू राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
●●●●●