वेध ताज्या घडामोडींचा/नवीमुंबई दि. २५ – एकेकाळी हमाल म्हणून गणल्या गेलेल्या माथाडी कामगारांवर कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. या कामगारांचे भविष्य काय, त्यांच्या मुलांचे भविष्य काय, असे अनेक प्रश्न होते तर त्यांच्यासाठी कोणताही कायदा त्याकाळात नव्हता. त्यांची आर्थिक पिळवणूक व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना परिसीमा नव्हती. अशा या कामगारांसाठी स्व.अण्णासाहेबांनी अथक परिश्रमाने ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केली त्यांना आजच्या या जयंती निमित्त अभिवादन करतो, त्यांच्याकडे दैवत म्हणून आम्ही पाहतो. त्यांच्या कार्यापासून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते. असे ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे व मराठा आरक्षण मागणीचे जनक मराठा क्रांतीसुर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त नवीमुंबईतील कांदा-बटाटा मार्केट मधील लिलावगृह येथे महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने अयोजित केलेल्य मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ऐसिहासिक कामगार कायद्याच्या निर्मितीमुळे आज माथाडी कामगारांचे अस्तित्व अबाधित आहे. हा कायदा बदलण्याचे प्रयत्न अनेक सरकारांनी केले आताही तीच परिस्थिती आहे. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकीर्दीत या माथाडी कायद्यातील त्रुटींमध्ये सुधारणा करून या कायद्याला कायमस्वरूपी सुरक्षा कवच निर्माण करून द्यावे. असे देवेंद्रजींनी केले तर अण्णासाहेबांच्या प्रत्येक जयंतीला माथाडी कामगार त्यांचा उल्लेख अदबीने करत राहील असे वक्तव्य युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यानी आपल्या स्वागतपर प्रास्ताविक भाषणातून केले. ते पुढे असेही म्हणाले की माथाडी कामगार हाही तसा अल्पभूधारक असून पंतप्रधान आवास योजनेतील घरे ही माथाडी कामगारांना मिळाली पाहिजे. नाशिकच्या माथाडी कामगारांचा लेव्हीचा प्रश्न त्वरीत सोडवावा अशीही मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तर वडाळा येथील सोळा एकरावर ३५०० माथाडी कामगारांच्या वसाहतीचा प्रश्न लवकरच सोडवावा व आमचा विश्वास सार्थ करावा असेही शशिकांत शिंदे म्हणाले. याबरोबरच त्यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे व सर्व सुरक्षायंत्रणेचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत केले.
माथाडी कामगारांचे कित्येक प्रलंबित प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या कालावधीत सोडविले असून आताही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मी साहेबांना विनंती करेन की, हे प्रलंबित प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवावे. या प्रलंबित प्रश्नांमध्ये नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न. कायद्यानुसार आमच्या बाजूने निकाल लागूनसुध्दा त्याची अंमलबजावणी आडते,व्यापारी विरोध करीत असल्यामुळे होत नाही. तेव्हा देवेंद्रजींनी नाशिक येथील ५००० माथाडी कामगारांना न्याय द्यावा व सुरक्षित करावे. दुसरे म्हणजे नवीमुंबई येथे फ्रुट मार्केट मध्ये बांग्लादेशी कामगार कमी मजूरीमध्ये काम करीत असल्यामुळे माथाडी कामगारांवर अन्याय होत असून त्यांना कोणताही अधिकार अथवा ते देशाचे नागरिक नसूनही अनधिकृतपणे काम करीत आहेत. हा प्रकार त्वरीत थांबावावा, तसेच ट्रक टर्मिनल येथे सिडकोची वसाहत उभी राहत आहे. तेथे बाजार समितीच्या मार्केटमधील कामगारांना घरे देण्यास प्राधान्य द्यावे व पंतप्रधान आवास योजनेतही प्राधान्य द्यावे अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात केली. पुढे ते असेही म्हणाले की, माथाडी कायद्यात बदल करा पण तो बदल माथाडी कायद्याशी संबंधित सर्व घटकांना सुसह्य व न्याय देणारा असावा. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नामांतर मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असे करण्याची आग्रही मागणीही नरेंद्र पाटील यांनी केली.
नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यानी भाषणात केलेल्या मागण्यांसंदर्भात देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलले की, मध्यंतरी अनेक स्थित्यंतरे झाली. हा आगळा-वेगळा माथाडी कायदा बदलण्यासाठी दबाव आले. पण आम्ही त्याला बळी पडलो नाही. माथाडी कामगारांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कावर मी सत्तेवर असेपर्यंत कधीही गदा येणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. हा कायदा बदलण्याचे अनेक ठराव झाले. पण ते नाकारण्याचं काम आम्ही केले. सरकारपेक्षा माथाडी कामगार हा मला महत्वाचा आहे. त्यांच्या अनेक अडचणी आम्ही दूर केल्या व यापुढेही दूर करीत राहू. नाशिकच्या कामगारांच्या लेव्हीचा प्रश्नासंदर्भात येत्या १५ दिवसात पणनमंत्री व कामगारमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन लवकरात लवकर कामगारांना न्याय देऊ. तसेच माथाडी कामगारांच्या वडाळा वसाहत उभारणीतील अडचणी दूर करून व पंतप्रधान आवास योजनेतही माथाडी कामगारांना घरे मिळवून देऊ असे अभिवचनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध माथाडी मंडळातील १८ गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणाऱ्या माथाडी कामगारांमधील मराठा उद्योजकाचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये १,००,००० मराठा तरूण-तरूणींना उद्योजक केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व सुत्रसंचालन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. पोपटराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवीमुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, भाजपचे रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे, अधिकारी दिपक शिंदे, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव मानकुमरे, जावली बँकेचे अध्यक्ष विजय भिलारे, बाजार समितीचे सभापती श्री. अशोक डक, सचिव पी.एल.खंडागळे आणि सर्व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील, युनियनच्या कायदेशीर सल्लागार व माजी नगरसेविका भारतीताई पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, आनंद पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड आणि तमाम माथाडी कामगार हजारोंच्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.
स्व.अण्णासाहेबांनी अथक परिश्रमाने ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केली त्यांना आजच्या या जयंती निमित्त अभिवादन
