वेध ताज्या घडामोडींचा/दि.5 नवीमुंबई: सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असल्याने व त्यासाठीचा पारेषन कालावधी लक्षात घेता या कालावधीत हिवताप / डेंग्यू आजारांसह साथजन्य आजारांचा देखील फैलाव होतो. त्या अनुषंगाने हिवताप / डेंग्यू या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवणेकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात एकुण 48 विशेष तपासणी व जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.
साथरोग / जलजन्य आजार हे दूषित पाणी, वैयक्तिक व सभोवतालची अस्वच्छता, माशा, उघडयावरचे अन्न यामुळे होतो व यामध्ये ताप येणे, उलट्या होणे, अतिसार, अशक्तपणा, त्वचा कोरडी पडणे इत्यादी लक्षणे आढळतात. यावार उपाय म्हणून घर व परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा, पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, अतिसार झाल्यास क्षारसंजीवनी मिश्रणाचा वापर करावा व अन्न सेवन चालू ठेवावे, सर्व कचरा घंटा गाडीत टाकावा, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरावा, शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये याबाबत जनजागृती करण्यात आली.
या शिबिरांना सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून आज 5 ऑगस्ट रोजी 24 ठिकाणी आयोजित केलेल्या शिबीरांना 11,562 नागरिकांनी भेट दिली असून, त्यांना हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली तसेच 1466 रक्त नमुने तपासणी करण्यात आले.
यापूर्वीही 03 ऑगस्ट रोजी आयोजित 24 ठिकाणच्या शिबिरांमध्ये 8053 नागरिकांनी भेट दिली असून, 1025 रक्तनमुने घेण्यात आले आहेत.
यानुसार दि. 03/08/2024 व दिनांक 05/08/2024 रोजी एकूण 19615 नागरीकांनी शिबिरांना भेट दिली असून, त्यांना हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच 2491 रक्त नमुने तपासणी करण्यात आले.
या शिबिरांचे वैशिष्ट म्हणून ॲनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्यासोबत पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरडे ठेवणे, भंगार साहित्य, टायर्स इत्यादी नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात आले.
तरी आरोग्य विभाग व नागरिक यांनी एकत्रित समन्वय ठेवून हिवताप व डेंग्यू नियंत्रण ठेवण्यासाठी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे बाबत एकत्रित कार्यवाही केली तर हिवताप / डेंग्यू रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यास यश येईल. त्यामुळे नागरिकांनी हिवताप व डेंग्यू रोखण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मलेरिया, डेंग्यू प्रतिबंध व जनजागृतीसाठी आयोजित विशेष शिबीरांचा नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणावर लाभ
मलेरिया, डेंग्यू प्रतिबंध व जनजागृतीसाठी आयोजित विशेष शिबीरांचा नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणावर लाभ