निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिणाम नागरिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?
रस्त्यातील खड्यांना ठेकेदार की प्रशासन जबाबदार
वेध ताज्या घडामोडींचा/दि.5 पनवेल: पनवेलमधील रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे अनेक अपघातांना दररोज वाहनचालक सामोरे जात आहेत. मात्र रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजता पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे. ही तरुणी दुचाकीवरुन तीच्या मित्रासोबत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावर नांदगाव पुलावरुन जात असताना पुलावर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही दुचाकीवरुन खाली कोसळले. त्याच दरम्यान पाठीमागून येणा-या ट्रेलरच्या चाकाखाली २४ वर्षीय तरुणी ठार झाली. मृत तरुणीचे नाव मानसी रोकडे असे आहे.
मुंबई (भायखळा) घोडपदेव येथील म्हाडा वसाहतीमध्ये राहणा-या मानसी त्यांचा मित्र आदेश लाड यांच्यासोबत माथेरान ते मुंबई असा दुचाकीवरुन प्रवास करुन घरी येत असताना रविवारी हा अपघात झाला. पळस्पे ते जेएनपीटी मार्ग हा कॉंक्रीटचा बांधला असला तरी त्यावरही ठिकठिकाणी खड्डे आहेत. नांदगाव पुलालगत मोठा खड्यात आदेश चालवित असलेल्या दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही रस्त्याच्या उजव्या बाजूला उडवले गेले. या दरम्यान आदेशच्या दुचाकीमागून भरधाव वेगाने ट्रेलर (क्रमांक एमएच ४३,यु. १६७३) येत होता. याच ट्रेलरच्या चाकाखाली मानसीचे शरीर आले. यात मानसीचा चेहरा, मान, पाठ यावर हे भरधाव ट्रेलरचे चाक गेल्याने ती ठार झाली.