- कोकण विभागीय महसूल सप्ताहाची
सांगता सांगितीक मेजवानीने
–सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ. सुरेश वाडकर अन् सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान
यांची लाभली विशेष उपस्थिती
वेध ताज्या घडामोडींचा/दि.९,ठाणे: शासनाने दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र विविध लोकोपयोगी उपक्रमांनी हा सप्ताह साजरा करण्यात आला.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्येही महसूल सप्ताहाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे येथे “कोकण विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम व सांगितीक मेजवानी” ने झाली.
यावेळी सुप्रसिद्ध गायक पद्मश्री डॉ.सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान, अभिनेत्री पूजा हेगडे, गायिका सायली कांबळे आणि कु.अंशिका चोणकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या महसूल सप्ताह-2023 च्या सांगता समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा होते. तर या कार्यक्रमास मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे, माजी विभागीय आयुक्त एस.एस.संधू, विलास पाटील, सुभाष हजारे, कोकण विभागातील मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, महानगरपालिका प्रशासन संचालक मनोज रानडे, अतिरिक्त विभागीय आयुक्त किसन जावळे तसेच महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट असे कला सादरीकरणही केले. तसेच सर्वांच्या मनोरंजनासाठी शशांक कल्याणकर आणि सहकारी यांच्या “एक संगीत संध्या” हा वाद्यवृंदाचा सुमधुर कार्यक्रमही सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात स्वतः पद्मश्री डॉ.सुरेश वाडकर, सायली कांबळे आणि कु.अंशिका चोणकर यांनीही आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना अभूतपूर्व असा आनंद दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले तर शेवटी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.