मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानात रंगणार संगीतमय सकाळ
– नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी महापालिका आली पुढे; घेतला महत्वाचा निर्णय
वेध ताज्या घडामोडींचा, दि.११,मुंबई: नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेच्या उद्यानात निसर्गाच्या सान्निध्यात संगीतमय सकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १४ जानेवारी रोजी पालिकेच्या १० उद्यानात सकाळी ७ ते १० या वेळेत शास्त्रीय कार्यक्रम होणार असून मुंबईकर संगीत रसिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
पालिकेच्या उद्यान खात्यामार्फत आणि स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने मुंबईतील नागरिकांकरीता विविध उपक्रम राबविले जातात. पालिकेच्या २४ विभागातील उद्यानांमध्ये विविध प्रकारच्या संकल्पना राबविण्यात येत असतात. वाचनालय, नाविन्यपूर्ण संकल्पना, लहान मुलांसाठी खेळाची साधन सामग्री देखील उद्यानांमध्ये बसविण्यात आली आहे. मोठ्यांसाठी प्रभातफेरी, ग्रीन जीम, मियावाकी वृक्षारोपण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एनसीपीए, बानायन ट्री आणि ताराप अशा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामार्फत नवोदित कलाकारांसाठी एक नवा मंच उपलब्ध करून देण्यात येतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील या संस्था आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारी रोजी मुंबई ग्रीन रागा (निसर्गाच्या सानिध्यात संगीतमय सकाळ) हा उपक्रम मुंबईतील १० उद्यानांमध्ये सकाळी ७ ते १० या वेळेमध्ये शास्त्रीय कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
या उद्यानात होणार कार्यक्रम-
मारुती मैदान दहिसर, टीबीएएफ कांदिवली पूर्व, माईंड स्कॅप गार्डन मालाड पश्चिम, हिरानंदानी गार्डन पवई, किशोरकुमार गार्डन जुहू, लायन जुहू पार्क सांताक्रुझ पश्चिम, वीर बाजीप्रभू उद्यान शिवाजी पार्क, सेंट जोसेफ बाफ्ता गार्डन माझगाव, कमला नेहरू पार्क मलबार हिल, सी डी देशमुख उद्यान मुलुंड पूर्व
———–