वाढत्या वायू प्रदूषणामुळे रहिवाशांना मुखपट्टी लावण्याचे पनवेल पालिकेचे आवाहन
वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,पनवेल:हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी जास्त वाढते यामुळे नागरिकांना या दिवसात श्वासणाचा त्रास होऊ शकतो यासाठी वाढते वायू प्रदूषण ध्यानात घेता पनवेल महापालिकेने श्वसनदाह रुग्णांना मुखपट्टी लावण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने मुखपट्टी पाळण्याची सूचना पाच वेगवेगळ्या घटकांना केली आहे. यामध्ये पाच वर्षांखालील मुले, वृद्धपकाळातील व्यक्ती, गरोदर माता, श्वसन व हदयाचे दुर्धर आजार असलेली व्यक्ती, तसेच ज्या व्यक्तींची पोषणस्थिती खराब आहे आणि स्वयंपाक, उष्णता आणि प्रकाशासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करणाऱ्या व्यक्तींसोबत वाहतूक पोलिस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार आदी व्यक्तींनी मुखपट्टी घालण्याचे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वायू प्रदूषण हे तळोजा वसाहतीमध्ये असल्याची ओरड येथील रहिवाशांकडून होत आहे. या परिसरात राहणारे राजीव सिन्हा यांनी लोकायुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या परिसरात एकही आरोग्यवर्धिनी केंद्र नसल्याने येथील रहिवाशांपैकी किती जणांना श्वसनदाहाचे आजार आहेत याची संख्या पालिकेकडे उपलब्ध नाही. मुंबईत धुलीकण हवेत वाढल्याने प्रदूषणावर मात्रा म्हणून मुबंई पालिका रस्त्यांवर पाणी मारुन धुलीकण कमी कऱण्याचे काम सूरु आहे. पनवेलमध्ये मुंबईपेक्षा मोठ्या प्रमाणात तळोजा व इतर परिसरात बांधकामे सूरु आहेत. या बांधकामांमधून निघणारे धुलीकण, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामातून निर्माण होणारे धुलीकण, पनवेलमध्ये ८० दगड उत्खनन करणा-या खदाणी आहेत. या खदाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानूसार सूरु आहेत का असा प्रश्न आहे. पनवेल व तळोजा परिसरातील बांधकामांभोवती धुलीकण थेट हवेत जाऊ नये यासाठी हिरवे पडदे लावले आहेत का, खदाणीतून निघणा-या धुळीसाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. पनवेलमधील लोकप्रतिनिधींची भागीदारी बांधकाम व्यवसाय आणि खदाणींमध्ये असल्याने या व्यवसायाविरोधात कोणताही राजकीय पक्ष बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आनंद गोसावी यांनी या वायूप्रदूषणामुळे रिक्षाचालक, तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे विक्रेते आणि प्रदूषित वातावरणात घराबाहेर काम करणारे इतर नागरिकांना या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे. स्वयंपाकासाठी बायोमास (गोवऱ्या/ लाकूड) जाळणाऱ्या स्त्रिया घरातील कामामुळे असुरक्षित असल्याचे पालिकेने म्हटले आहे.