पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन भूमीपूजन, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
वेध ताज्या घडामोडींचा/दि.७,पुणे:– मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याने चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत समावेश झाला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात विस्तारीकरण होणा-या आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन माध्यमातून होणार आहे.
रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत मावळ मधील रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यासाठी खासदार बारणे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण, सुशोभीकरण व्हावे, प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार बारणे हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. प्रवासी संघटनेची देखील विस्तारीकरणाची मागणी होती. अखेरिस त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार स्टेशनचे योजनेत समावेश झाला. पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्टेशनच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाइन माध्यमातून भूमीपूजन होणार आहे. खासदार बारणे हे दोनही रेल्वे स्थानक येथे उपस्थित असणार आहेत.
विस्तारीकरणात काय होणार
या योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी ४० कोटी ३५ लाख तर आकुर्डी रेल्वे स्थानकासाठी ३३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिले जाणार असून रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे. यापूर्वी खासदार बारणे यांच्या माध्यमातून नेरळ रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
प्रतिक्रिया- भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगावदाभाडे या चार स्टेशनचा कायापालट होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन स्टेशनच्या कामाला रविवारी प्रारंभ होईल. आगामी काळात मतदारसंघातील सर्व रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण केले जाणार आहे. लोणावळ्यात ओव्हर ब्रीज उभारण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षामध्ये मावळ मतदारसंघातील अनेक गावांना जोडणा-या भुर्यारी मार्गाची कामे झाली आहेत.
– श्रीरंग बारणे,खासदार मावळ शिवसेना