वेध ताज्या घडामोडींचा/दि.४,जालनाः शुक्रवारी जालन्यातल्या अंतरवाली येथे मराठा आंदोलनाला हिंसाचाराचं स्वरुप आलं. पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला केला अन् आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे राज्यभर वातावरण पेटलं. खुद्द शरद पवार यांनी पोलिसांच्या बाबतीत नरामाईची भूमिका घेत गृहमंत्रालयाकडून आदेश आल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणात आज एक नवीनच ट्वीस्ट समोर येतोय. तो म्हणजे अंतरवालीच्या मराठा आंदोलनामध्ये ज्यांनी उद्रेक केला त्यात संभाजी भिडेंचं कार्यकर्ते होते, असा आरोप करण्यात येतोय. जालना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा संभाजी भिडे चर्चेत आले आहेत.
संजय लाखेंनी म्हटलंय की, आजपर्यंत मराठा समाजाने जेवढी आंदोलने केली ती सर्व शांततेच्या मार्गाने करण्यात आली आहेत. मराठा आंदोलनात उद्रेक करणारे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते होते. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तसे न केल्यास शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक बसू, असा इशारा त्यांनी दिला. लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी जालन्याच्या आंदोलनामध्ये उद्रेक केला, असा थेट आरोप संजय लाखे पाटील, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक जालना यांनी केला आहे.
आज मंत्रिमंडळ उपसमितीची एक बैठक बोलावण्यात आलेली होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यात मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका बोलून दाखवली