डॉ. राहुल गेठे यांची नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर उपायुक्तपदी नियुक्ती

वेध ताज्या घडामोडींचा/दि.२९, नवीमुंबई:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी (गट अ) डॉ.राहुल बी गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास राज्यशाासनाने मान्यता दिली असून आता ते नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त पदावर रुजू झाले आहेत. महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या 28 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त म्हणून डॉ.राहुल गेठे कार्यरत राहणार आहेत.

डॉ.राहुल गेठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून आपल्या कार्यकुशलतेचा व गतिमान कार्यवाहीचा ठसा उमटवलेला आहे. कोव्हीड प्रभावित काळात नवी मुंबई महानगपालिकेत उपायुकत पदावर कार्यरत राहून कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना डॉ.राहुल गेठे यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. विशेषत्वाने इंडिया बुल्स सारखे जंबो कोव्हीड काळजी केंद्र उभारण्यात व ऑक्सिजन उपलब्धता करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. केवळ नवी मुंबई महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हीड कालावधीत तळोजा, मुरबाड, चाकण, येथील ऑक्सिजन प्रकल्पांवर सरकारमार्फत पर्यवेक्षक म्हणून डॉ. राहुल गेठे यांनी नियोजनबध्द कार्यवाही केली आहे.

मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना गडचिरोलीमध्ये सुरजागड लोहखनिज प्रकल्प पूर्ण करण्यात डॉ.राहुल गेठे यांनी विशेष भूमिका बजावलेली असून गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेत पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी केलेली आहे.  सन 2019 मध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, चिपळूण येथील पूरजन्य परिस्थितीमध्ये त्यांनी तत्पर मदत कार्य केलेले असून मागील महिन्यातील इर्शाळवाडी आपत्ती प्रसंगातही त्यांनी पूर्णवेळ मदतकार्यात सहभाग घेतलेला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त संवर्गाची 11 पदे मंजूर असून शासनाकडील प्रतिनियुक्तीच्या कोटयातील 5 उपलब्ध पदांपैकी एका पदावर डॉ. राहुल गेठे यांचे समावेशन करण्यात आलेले आहे. डॉ. राहुल गेठे यांच्या नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर उपायुक्तपदी समावेशनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेस कायमस्वरुपी उपायुक्त उपलब्ध झालेला आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *