जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्या – प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे

जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्या – प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे

वेध ताज्या घडामोडींचा/ दि.24,सातारा: अंमली पदार्थांमुळे शरीरावर होणाऱ्या दुषपरिणामाची समाजात जनजागृती करुन जिल्ह्यात अंमली पदार्थांचा पुरवठा होणार नाही याची खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को कोऑर्डीनेशन समितची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी श्री. गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक र्किती शेडगे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्यावी, असे सांगून श्री. गलांडे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील हॉटेल, लॉज यांची वेळोवेळी तपासणी करावी. महाबळेश्वर येथे दशेभरातून पर्यटक येत असतात त्यामुळे येथील हॉटेल्स व लॉजवर लक्ष केंद्रीत करावे याचबरोबर कुरीअर सेवा देणाऱ्या संस्थांचीही वेळोवेळी तपासणी करावी.
शेतांमध्ये गांजा पिकाची लागवड होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर लागवडीची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करावी. शाळा, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या स्नेह संमेलनात पालक, विद्यार्थी व शिक्षक एकत्र येत असतात. यावेळी अंमली पदार्थांबाबत जनजागृती करावी. यासाठी शाळा, महाविद्यालयीन प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रभारी जिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *