नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत सदैव आग्रही – खासदार बारणे
वेध ताज्या घडामोडींचा/पनवेल, दि. ७ एप्रिल – नवी मुंबई- पनवेल येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आधीही आग्रही होतो, आजही आग्रही आहे आणि नामकरण होईपर्यंत आग्रही राहीन, अशी भूमिका मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकारणाबाबत विरोधकांकडून खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. त्याबाबत खासदार बारणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
बारणे म्हणाले की, नवी मुंबई-पनवेल येथे होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत आपण केंद्र शासनाची वेळोवेळी पत्र व्यवहार देखील केलेला आहे. पनवेल-उरण भागातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाला भाग पाडले. एक कृतिशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शेतकरी व भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी सातत्याने लढा दिला.
अशा या दिवंगत दिग्गज नेत्याच्या सन्मानार्थ शासनाकडून विमानतळाला त्यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करू, या भूमिकेचा बारणे यांनी पुनरुचार केला.