शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश

शहर स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आयुक्तांचे आदेश

वेध ताज्या घडामोडींचा/दि.20,नवीमुंबई:पावसाळा सरल्यानंतरच्या कालावधीत शहर स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे विभागातील विविध ठिकाणांना भेटी देत स्वच्छता कार्याला अधिक प्रभावीपणे गती देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व शिरीष आरदवाड तसेच विभाग अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते..

पावसामुळे रस्त्यांच्या कडेला व दुभाजकांमध्ये मोठया प्रमाणावर गवत अस्ताव्यस्त वाढलेले दिसत असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही रस्त्यातील रहदारीला व वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने उदयान विभागाने प्राधान्याने मुख्य रस्ते व त्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरील दुभाजक आणि रत्याच्या कडेला वाढलेले गवत काढून घ्यावे तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांदयांची पुरेशा प्रमाणात छाटणी करावी असे निर्देशित केले.

      शहरातील प्रमुख रस्त्यांवर सातत्याने रहदारी सुरु असते त्यामुळे धूळ व बारीक मातीही दुभाजकांच्या कडेला खालच्या बाजूला साचून राहते. त्याच्या साफसफाईकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे दिवसातून दोन वेळा स्वच्छता होणा-या वाणिज्य भागातील स्वच्छता अधिक काटेकोरपणे होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. वाणिज्य भागातील व्यावसायिकांकडून ओला व सुका असे कच-याचे दोन डबे आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागी ठेवले जातील यावरही विशेष लक्ष दिले जावे असे त्यांनी निर्देशित केले.

      सानपाडा येथे उड्डाणपूलाखाली बनविलेला गेमींग झोन ही नवी मुंबई महानगरपालिकेची वेगळी संकल्पना राष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली असून त्याठिकाणच्या स्वच्छता व देखभालीकडे बारकाईने लक्ष देण्याचे व तेथे खेळायला येणा-या मुलांशी चर्चा करुन त्यांना आवश्यक असणा-या अधिकच्या सुविधा त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांची पूर्तता करण्याकडे विशेष लक्ष देण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. त्याठिकाणी प्रशिक्षक उपलब्ध करून देऊन काही खेळांचे प्रशिक्षण देता येणे शक्य आहे काय, याचीही तपासणी करण्याचे त्यांनी सूचित केले,

      अशाच प्रकारे कोपरखैरणे येथील निसर्गेादयानात निर्माण केलेला स्वच्छता पार्क हा उपक्रमही माहिती व ज्ञानाच्या दृष्टीने अतिशय अभिनव असल्याचा नावलौकिक देश पातळीवर झालेला असून यामध्ये काळानुरुप बदल करण्याच्या दृष्टीने व तो डिजीटल युगाला साजेसा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.त्याचप्रमाणे येथील मियावाकी शहरी जंगलाची झपाट्याने झालेली वाढ लक्षात घेऊन व जैवविविधतेत पडलेली लक्षणीय भर लक्षात घेता शहरात इतरही काही ठिकाणी अशा प्रकारची मियावाकी जंगले विकसित करणेबाबत पाहणी करावी व अहवाल सादर करावा असे आयुक्तांनी सांगितले.

    यावेळी निसर्गोदयानाशेजारील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टला भेट देत तेथील कार्यप्रणाली सुयोग्य रितीने कार्यान्वित असल्याची आयुक्तांनी पाहणी केली. येथील पुनर्प्रक्रियाकृत पाणी उदयोगसमुहांना पुरविले जात असून 20 द.ल.लि. प्रकल्प क्षमतेपैकी 8 द.ल.लि. पुनर्प्रक्रियाकृत पाणी उदयोग समुहांच्या वापरासाठी पुरविण्यात येत आहे. यामधील पूर्णच्या पूर्ण 20 द.ल.लि पाणी वापरात यावे यादृष्टीने उदयोगसमुहांशी चर्चा करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. सद्यस्थितीत या पुनर्प्रक्रियाकृत पाण्यातून शहरातील बागा फुलविल्या जात आहेत. हे सर्वच्या सर्व पाणी उदयोग समुहांना वापरण्याकरीत देऊन पिण्याच्या पाण्याची बचत करणे व या पाणी विक्रीतून महानगरपालिकेस निधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे.

      यावेळी काही ठिकाणांची पाहणी करण्यासोबतच शहरातून फिरत असताना अनेक ठिकाणी थांबून आयुक्तांनी तेथील स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित केले. तसेच विविध ठिकाणच्या शिल्पाकृती, आय लव्ह नवी मुंबई पॉईंट्स दुरुस्त करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

      नवी मुंबईने शहर स्वच्छतेत सातत्य राखल्याने तसेच स्वच्छतेच्या नवनव्या संकल्पना राबविल्याने नवी मुंबईकडून फार मोठया अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यामुळे या अपेक्षांची परिपूर्ती करुन नवी मुंबईकर नागरिकांना सुखद अनुभूती मिळेल व नवी मुंबईला भेटी देणा-या पाहुण्यांना व पर्यटकांनाही स्वच्छतेमधील नवी मुंबईचे वेगळेपण जाणवेल ही आता आपली सामुहिक जबाबदारी झाली असून त्याकरिता महानगरपालिकेच्या यंत्रणेने कायम सतर्क राहून सातत्य राखून काम केले पाहिजे असे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहर स्वच्छतेला गती देण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *