वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,मुंबई:–
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीनंतर मागे घेतले. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गुरुवारी सकाळी फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरु होती. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत संवाद साधत होते. याप्रश्नी शिवसेनेची भूमिका आंदोलकांच्या मागण्यांना पुरक होतीच, पण सरकारदरबारीही मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्यासंदर्भात कडक पावले उचलण्यात येत होती. मुख्यमंत्री साहेबांच्या आणि शिवसेना पक्षाच्या वतीने अनेक नेत्यांनी आंदोलकांशी संवाद साधताना दिलासादायक मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला होता.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे यांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेची आंदोलकाच्या मागण्याप्रकरणी असलेली सकारात्मक भुमिका आणि सरकार सातत्याने त्याचा पाठपुरावा करत असलेली कार्यवाही याबाबत माहिती देत समन्वय साधण्याची भुमिका घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी राज्याची सुत्रे हाती घेताच मराठा समाजासंदर्भात अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू असतानाच समाजाच्या उन्नतीसाठी सरकार विविध आघाड्यांवर प्रयत्नही करत आहेत. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि टिकणाऱ्या आरक्षणासंदर्भात अभ्यासात्मक पावले उचलण्याबाबत शिवसेनेची आग्रही मागणी आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मुख्यमंत्री साहेबांच्या मराठा आरक्षणाच्या भुमिकेबद्दल प्रचंड विश्वास दर्शवला आहे. आगामी काळात शिवसेना संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी भुमिका मांडत मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली न्याय देण्यास कटीबद्ध राहील हा विश्वास आहे.