सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. ‘पीओपी’ मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी.
वेध ताज्या घडामोडींचा/दि.१,नवीमुंबई:महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी तसेच रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणे परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” नवी मुंबई महानगरपालिकेने विकसीत केली आहे. सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या www.rtsnmmconline.com या वेबसाईट (Website) वर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करण्यास गणेशोत्सवापूर्वी एक महिना आधी दि. 19 ऑगस्ट 2023 पासून कार्यालयीन वेळेमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. मंडप उभारणी करता कोणतेही शुल्क अथवा अनामत रक्कम आकारण्यात येणार नाही याचीही विशेष नोंद घ्यावयाची आहे. नवरात्रौत्सवासाठीही याच वेबसाईटवर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. दोन्ही उत्सवाच्या १० दिवस अगोदर ऑनलाईन प्रणालीद्वारे परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावयाची आहे. गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये, तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरु नये आणि परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नये असे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल याची सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ/नागरिकांनी दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे. मंडप उभारणी परवानगी अर्ज विहित कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाईन (Online) सादर करावेत. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. विशेष करुन गणेशोत्सव/नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी याची नोंद घ्यावी. उत्सव सुरु होण्याच्या १० दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि पर्यावरणपूरक इको फ्रेंडली श्री गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.