दिव्यांगांच्या दारी’ अभियानामध्ये योजनांचा लाभ घ्यावा — जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

वेध ताज्या घडामोडींचा/अलिबाग, दि.25:- दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानानिमित्त मंगळवार दि.29 ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय, अशेाक बाग, जुना पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास दिव्यांग अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून दिव्यांगासाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

राज्य शासनाने दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशान्वये दिव्यांगांच्या दारी हे अभियान राज्यातील सर्व महसूल विभागातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात अभियानानिमित्त मेळावा होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड ,जिल्हा परिषद रायगड आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता व दिव्यांग व्यक्तींना शारिरीकदृष्ट्या सोईचे व्हावे यासाठी दिव्यांग अभियान राबविण्यासाठी तालुकास्तरावर मेळावे सुद्धा घेण्यात येणार आहे. पर्यायाने हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविले जाईल. त्यामुळे अभियानामध्ये ग्रामीण व तळागाळातील दिव्यांग व्यक्ती या अभियानात सहभागी होतील असेही जिल्हाधिकारी डॉ म्हसे यांनी सांगितले.

या शिबीरांमुळे दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांच्या लाभासाठी अत्यावश्यक असणारे उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, युडीआयडी, दिव्यांग प्रमाणपत्र, मतदान कार्ड आदी दाखले विनासायस मिळणार आहेत.

रायगड जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना त्या-त्या तालुक्यांमध्ये होणाऱ्या शिबीरांमध्ये उपस्थित राहून या अभियानांचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *