अभिमानास्पद!
भारताचा ‘चंद्रस्पर्श’… चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
वेध ताज्या घडामोडींचा/दि.२३,मुंबई:भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी… चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा… कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेली आहेत.
अभिमानास्पद! भारत चंद्रावर पोहोचला
भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.
40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर लँडिंग
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागले. 14 जुलै रोजी पृथ्वीवरून निघालेलं चांद्रयान-3 आज 40 दिवसांनंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलं. भारताची ही ऐतिहासिक चंद्रमोहिम आहे. महत्त्वाचं म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पानं जोडलं गेलं आहे.
देशभरात उत्साहाचं वातावरण
भारत आता चंद्रावर पोहोचल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक भारतीय इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक करत आहे. 2019 रोजी इस्रोची चांद्रयान-3 मोहिम अयशस्वी झाली. त्यानंतर चार वर्षानंतर चंद्रमोहिमेत भारताला यश मिळालं आहे. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर त्यामध्ये इस्रोकडून अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आणि त्याचंच हे फळ ज्यामुळे भारत चंद्रावर पोहोचला आहे.