वेध ताज्या घडामोडींचा/दि.१४,नवीमुंबई: : रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या पनवेलमध्ये महापालिका प्रशासन वाहतूक नियमनाविषयी बालकांना साक्षर करणारे पहिले वाहतूक नियमनांचे (ट्रॅफीक) उद्यान खारघर वसाहतीमध्ये उभारणार आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ए येथील ९५०० चौरसमीटर जागेवर हे उद्याण उभारले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाहतूकीचे नियमन लहानग्यांना समजण्यासाठी या उद्यानाची मागणी केली होती. त्यानंतर पनवेल महापालिका प्रशासनाने हे उद्यान बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.
पनवेलमध्ये २६० हून शाळा व महाविद्यालये आहेत. सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी संख्या असलेल्या पनवेलमधील विद्यार्थ्यांना बालवयापासून वाहतूक नियमनाची साक्षरता असल्यास येथील अपघात टाळता येतील, यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने बालकांना शालेय जिवणात उद्याणातील खेळातून वाहतूक नियमनाचे धडे मिळू शकतील यामुळे ट्रॅफिक पार्कची संकल्पना आखण्यात आली. या पद्धतीचे पार्क ठाणे महापालिकेने उभारले आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने या ट्रॅफीक पार्कसाठी पुढाकार घेतला असून पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी या पार्कसाठी विशेष पुढाकार घेतला आहे.